नेकनूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणावर हातोडा
नेकनूर पोलिसांचा चोख बंदोबस्त
केज | प्रतिनिधी
नेकनूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याने शहराचे स्वरूप विद्रूप झाले होते. रस्त्यालगत वाढलेली अतिक्रमणे, अव्यवस्थित पार्किंग, अरुंद झालेला मार्ग आणि वाहतुकीची सततची कोंडी यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यातच एचपीएम कंपनीकडून करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांचे प्रमाणही वाढल्याची तीव्र भावनानागरिकांतून व्यक्त होत आहे.लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासूनच या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर तडे जाणे, उखडणे, पावसाचे पाणी साचणे अशा समस्या निर्माण झाल्या. काही ठिकाणी रस्ता उंच-सखल झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती.
दरम्यान, रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा मार्ग अधिकच अरुंद झाला होता. दुकानदारांनी लोखंडी शेड, पत्रे, फलक व इतर साहित्य रस्त्याच्या हद्दीत टाकल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरली नव्हती. परिणामी किरकोळ तसेच गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत होता.शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे. कोणालाही राजकीय किंवा आर्थिक पाठबळामुळे सूट मिळता कामा नये,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बीड जिल्हा पोलीस निरीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शखाली नेकनूर पोलीस स्टेशन चे ए. पी. आय. गोसावी ,पी. एस. आय.रोकडे .पी .एस आय.आहेर व पोलीस कर्मचारी यांनी मोहीम राबवून नेकनूर शहर अतिक्रमणमुक्त केल्यामुळे खऱ्या अर्थाने रस्त्याने सुटकेचा श्वास घेतला आहे.
