स्व.विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमाला: पुष्प- १ ले
यावर्षी व्याख्यानमालेचे २५ व्या वर्षात पदार्पण
प्रत्येक व्यक्तीने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे- पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने
केज/प्रतिनिधी
या स्पर्धेच्या युगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने ध्येयवादी बनले पाहिजे, तरच आपल्या संकल्पांची सहज प्राप्ती होईल. ज्यांनी आपल्या मनात आशा, विश्वास, प्रयत्न आणि डोळस श्रद्धा बाळगली असेल, अशी माणसंच आपल्या जीवनध्येयाची उंच शिखरं सहज गाठू शकतात. जीवनामध्ये अनेक स्वप्न बघा पण वाटचाल करत असताना टप्प्याटप्प्याने त्याची पूर्तता करा. यासाठी आपण कठोर परिश्रम, दृढ विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती मनात बाळगली पाहिजे. संकल्पाला आत्मविश्वासाचा आणि समर्पण वृत्तीचा सहवास लाभला तर तो सिद्धीस जातो. आपल्या जीवनाची खरी सार्थकता आशावादी दृष्टिकोन बाळगून जगण्यात आहे. खरं तर आशावादी माणसं प्रयत्नवादी असतात. प्रत्येकाची इच्छाशक्ती ही प्रबळ असली पाहिजे, इच्छाशक्ती कमी असणे हे अपयशाचे लक्षण आहे, यासाठी सर्वकश ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण मिरीट चांगली असेल तर सन्मानही योग्य मिळतो. सध्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्हाट्सअप, फेसबुक यांच्या वापर मर्यादित केला पाहिजे. अशी साधने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहेत. त्यामुळे केवळ डोळ्यांचेच नव्हे, तर इतरही आजार उद्भवत आहेत असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि. २० एप्रिल वार रविवार पासून स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यान मालेला नुकतीच सुरुवात झाली. यावर्षी या व्याख्यानमालेने २५ व्या वर्षात पदार्पण केले. तेंव्हा या व्याख्यानमालेचा शुभारंभ प्रमुख वक्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिष्ठाता जे. जे. रुग्णालय, मुंबई यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. लहू गळगुंडे, जिल्हा कोषागार अधिकारी बीड हे उपस्थित होते. इतर मान्यवर उपस्थितमध्ये सचिन देशपांडे, नायब तहसीलदार अंबेजोगाई, गोविंद अण्णा कद्रे, सामाजिक कार्यकर्ते बीड, नईमोद्दीन इनामदार, संस्थेचे माजी उपाध्यक्ष तसेच जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, संस्थेचे सचिव जी. बी. गदळे, संस्थेचे संचालक नारायण अण्णा अंधारे, शाळेच्या मा. वि. च्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्रा. वि. चे मु. अ. वसंतराव शितोळे, प्राचार्य शंकर भैरट, तसेच संस्थेचे सहसचिव तथा स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे मु. अ. गणेश कोकिळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव जी. बी. गदळे यांनी दिला. याप्रसंगी ते म्हणाले, ही संस्था दरवर्षी विविध उपक्रम राबवते तसेच शिक्षकवृंद ही शाळेचा गुणात्मक आलेख टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
पहिले पुष्प गुंफताना ” स्वप्न बघा स्वप्न जगा ” या विषयावर बोलताना डॉ. तात्याराव लहाने पुढे म्हणाले, जीवनामध्ये परिपक्व होण्यासाठी संस्कारक्षम शिक्षण घेतले पाहिजे. याप्रसंगी त्यांनी आपल्या जीवनातील काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले, माझे शिक्षणही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले. जीवनामध्ये आईचे काय महत्व असते, “आई म्हणजे समर्पण” असे का म्हटले जाते हे त्यांनी उपस्थित श्रोत्यांना आपल्या आईच्या त्यागाबद्दल अत्यंत भावनिक होऊन सांगितले. या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना बाबा आमटे यांच्याकडे जाऊन तेथील कुष्ठरोग्यावर उपचार केले, तसेच गडचिरोली, मेळघाट इथेही सेवा देण्याची संधी मिळाली. मागील जवळपास २६ वर्षात साडेचार लाख मोफत शस्त्रक्रिया केल्या. तसेच पन्नास लाख याचकांना दृष्टी देण्याचं अलौकिक कार्यही केले. सध्याच्या काळात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे, डायबिटीज विषयी सांगताना ते म्हणाले, जिभेवर नियंत्रण ठेवा, हृदयाला जपा व किमान तीन किलोमीटर नियमित चाला. कारण शरीर स्वास्थ्य हे निरोगी ठेवणं काळाची गरज आहे.
अध्यक्षीय समारोपात लहू गळगुंडे म्हणाले, प्रबोधनासाठी अशी व्याख्याने आयोजित करणे अत्यावश्यक आहे. यातून जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते. तसेच जीवनातील अनंत अडचणींना सामोरे जाण्याचे बळ ही मिळते. जीवन जगण्याच्या विविध पद्धती असतात, सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षणासाठी गुरुकुल ही व्यवस्था होती, आता ही संकल्पना कुलगुरू पर्यंत आली. ध्येय म्हणजे जगणं होय. सध्याच्या काळामध्ये प्रचंड ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. तेंव्हा प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार करिअर घडविण्याची पूर्णपणे संधी आहे. तेंव्हा आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येकाने वाटचाल करणे हे गरजेचे आहे.याप्रसंगी असंख्य श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवली तसेच पत्रकार बंधूही मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार रघुनाथ चौरे यांनी मानले.