अनुदानापासून वंचित असणाऱ्या शिक्षकांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा प्रयत्न- शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील
बीड जिल्ह्यातील वाढीव टप्पा अनुदानाच्या आदेशांचे वाटप!
अंशतः अनुदानित शिक्षकांत समाधान!
बीड /प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देऊन
अनुदानापासून वंचित असणाऱ्या शिक्षकांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मत शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील मॅडम यांनी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा अनुदान आदेश वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी नानासाहेब हजारे, उपशिक्षणाधिकारी,
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, अधीक्षक अजय बहीर, वेतन अधीक्षक राजेश खटावकर, शिक्षक नेते उत्तम पवार, डी. टी. सोनवणे, जितेंद्र डोंगरे, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.
राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान
मिळावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसा पासून होती. सरकारने 01 ऑगस्ट 2025 पासून वाढीव टप्पा अनुदान आणि त्यासाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर केला. या शासन निर्णया प्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना वाढीव टप्पा अनुदान आदेश तयार करण्यात आले. या वेळी वाढीव टप्पा अनुदान आदेश वाटपाचा कार्यक्रम घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती, स्वराज्य शिक्षक संघटना, शिक्षण समन्वय संघ, बीड जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ याशिवाय शिक्षण क्षेत्रात सातत्याने विविध प्रश्नावरती काम करणाऱ्या विविध शिक्षक आणि शिक्षकेत्तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील यांच्याकडे केली. विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील यांनी वाढीव टप्पा अनुदान आदेश वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन काल मंगळवार आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी स्काऊट भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमानंतर विविध शिक्षक संघटनेच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपामध्ये जितेंद्र डोंगरे आणि दत्तात्रय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. त्याच्या मनोगता नंतर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस यांनी उपस्थित सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील म्हणाल्या की, विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन आणि प्रशासन अत्यंत संवेदनशील आहे. या शिक्षकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रति शासन सतत सकारात्मक विचार करत आहे. नुकतेच शासनाने या विना अनुदानित शाळांना अनुदानावर आणण्यासाठी आणि अंशतः अनुदानित असणाऱ्या शाळांना पुढील वाढीव टप्प्याचे अनुदान देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद ही केली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास गेली अनेक वर्षापासून अनुदानापासून वंचित असणाऱ्या शिक्षकांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आज विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याच्या आदेशाचे वाटप करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. पुढील वाढीव टप्प्याचा म्हणजेच 100 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा आपणास लवकरात लवकर देण्याचे भाग्य आम्हाला मिळो अशी सदिच्छा यावेळी श्रीमती प्रियाराणी पाटील यांनी
व्यक्त केली.
यावेळी बीड जिल्ह्यातील 80 टक्के अनुदानास पात्र झालेल्या 82 शाळा आणि 76 तुकड्यांना, 60 टक्के अनुदान घेत असलेल्या 09 शाळा आणि 21 तुकड्या, 40% अनुदान घेत असलेल्या पाच शाळा आणि 160 तुकड्या, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या 09 तुकड्या अवघ्या 2 तासांमध्ये 100% आदेशाचे वाटप करण्यात आले. ज्या शाळा पटा अभावी अनुदानास पासून वंचित आहेत. या शाळेच्या बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचाही अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील यांनी दिले. दरम्यान प्राथमिक विभागाच्या वतीने ही 20 टक्के,40 टक्के 60 टक्के आणि 80 टक्के वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश वाटप करण्यात आल्याचे समजते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनय केंडे यांनी तर आभार आत्माराम वाव्हळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील अनुदानास पात्र असणाऱ्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.