स्वामी विवेकानंद शाळेच्या हिंदवी यादव हिची नवोदय विद्यालयासाठी निवड
केज/ प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज, संचलित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (मा. वि.) या शाळेची विद्यार्थीनी हिंदवी विष्णू यादव हिची नववी च्या वर्गासाठी नवोदय विद्यालय गढी येथे निवड झाली आहे. त्या बद्दल संस्थेच्या वतीने तिचा पालकासह सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शैलाताई इंगळे अध्यक्षा- शालेय व्यवस्थापन समिती तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब तिडके हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे व पालक विष्णू यादव सर तसेच प्रियंका यादव ( मुळीक ) मॅडम हे ही उपस्थित होते. याप्रसंगी हिंदवीचे पालक विष्णू यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनातील विजयी विद्यार्थ्यांचे विविध पारितोषिक देऊन त्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. या प्रदर्शनामध्ये ५ वी ते ७ वी तसेच ८ वी ते १० वी असे दोन गट तयार करण्यात आले होते. व विजयी स्पर्धकांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब तिडके यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विविध पारितोषिके दिली. तसेच ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाईल तेंव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना प्रचंड वाव मिळतो तसेच भविष्यामध्ये करिअर घडविण्यासाठी आपला आत्मविश्वासही वाढतो.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोथकांत समुद्रे यांनी केले. तर आभार कल्याण आदमने यांनी मानले.